Quantcast
Channel: Satyashodhak
Viewing all articles
Browse latest Browse all 15

परशुराम विरुद्ध सुभौम –डॉ.अशोक राणा

$
0
0

अक्षय्य तृतीया हा हिंदू लोकांचा आपल्या मृत पूर्वजांना अभिवादन करण्याचा एक महत्त्वाचा दिवस. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. दक्षिण भारतात परशुराम जयंती म्हणून तो साजरा होतो. यावेळी परशुरामाला अर्घ्य प्रदान करताना ‘जमदग्निसुतो वीर क्षत्रियान्तकर : प्रभो’ हा मंत्र म्हणतात. क्षत्रियांचा अंत करणारा अशी परशुरामाची प्रतिमा दृढ झाली आहे. २००५ साली जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जालना येथे ब्राह्मण महासभा भरली होती. त्यावेळी प्रेक्षकांमधून परशुरामवेशधारी युवकाचं आगमन व त्यानंतर झालेल्या जल्लोषाचं वर्णन प्रसारमाध्यमांनी मोठ्या उत्साहाने केलं होतं. याच सभेत परशुरामसेना उभारण्याचीही घोषणा करण्यात आली होती. क्षत्रिय अर्थात मराठ्यांच्या विरोधात जहाल भाषणं देणाऱ्या वक्त्यांनी परशुरामाचं यावेळी उदात्तीकरण केलं होतं. त्यावरून घडलं तर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. या महासभेत प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष वा.ना.उत्पात यांची उपस्थितांचा उन्माद वाढवणारी भाषणं झाली होती. त्यात ब्राह्मणांची संख्या वाढविण्याकरिता कुटुंब नियोजन कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याच्याही वल्गना करण्यात आल्या. यावरून संख्येच्या राजकारणात स्पर्धा करण्याचा मानस व बहुसंख्यांना शह देण्याची तयारी ब्राह्मणांनी केली आहे, हे स्पष्ट होतं. ब्राह्मण व बहुजन असं जातियुद्ध पेटण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे. पण प्रत्यक्षात तसं शक्य आहे काय ? साडेतीन टक्के ब्राह्मण पंचाऐंशी टक्के बहुजनांना पराभूत करण्याकरिता स्वत: रस्त्यावर येतील का ? तर ते कधीही शक्य नाही. तथाकथित उच्चवर्णीय त्यांच्या या जातियुद्धात कितपत मदत करतील, हाही एक प्रश्नच आहे. पण परशुरामाची मंदिरं उभारून व त्याच्या भजन-पूजनाच्या नादी त्यांना लावून ब्राह्मणविरोधाची धार बोथट करण्यात त्यांना यश येईल यात शंका नाही. म्हणून परशुरामाचा परिचय आपणास असणं आवश्यक आहे.

परशुराम चरित्र

जमदग्नीचा पुत्र म्हणून जामदग्न्य तसंच भृगुकुलात जन्मलेला म्हणून भार्गवराम आणि परशू धारण करणारा म्हणून परशुराम, अशी याची नावं पडलीत. पुराणांनी त्याला विष्णूचा सहावा अवतार म्हटलंय (पद्म.पु.२४८;मत्स्य.४७.२४४;वायू.३६.९०;९१.८८). देवी भागवताने (४.१६) तो एकोणिसाच्या त्रेतायुगात जन्मला असं म्हटलं, तर महाभारतात त्रेता आणि द्वापारयुगाच्या संधिकालात तो अवत्तीर्ण झाला असल्याचा उल्लेख आहे. (म.आ.२.३) त्यामुळेच रामायण व महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये तो आढळतो. परशुरामाचे पूर्वज आजच्या गुजरातचे रहिवासी असून पश्चिम भारतातील हैहय राजांचे पुरोहित होते. प्राचीन चरित्रकोशात (पृ.५५५) महामहोपाध्याय सिद्धेश्‍वरशास्त्री चित्राव यांनी इ.स.पू.२५५०-२३५० हा प्राचीन भारतीय इतिहासातील दोन शतकांचा काळ भार्गव हैहय काळ या नावाने ओळखला जातो, असं म्हटलं आहे. परशुराम जामदग्न्याच्या काळी भार्गव हैहय वैर पराकोटीस पोहोचलं आणि त्याचीच परिणती म्हणजे त्याने हैहयांच्या आणि तत्संबंधित क्षत्रियांच्या एकवीस वेळा केलेल्या संहारात झाली, असा समज दृढ आहे. वैदिक साहित्यात राम भार्गव (जामदग्न्य) या सूक्तद्रष्ट्याचा निर्देश आढळतो. (ऋ.१०.११०) हैहय राजा कार्तवीर्य आणि परशुराम यांच्या युद्धाचा संक्षिप्त उल्लेख अथर्ववेदात आढळतो. (अ.वे. ५.१८.१०). कार्तवीर्य राजाने जमदग्नी ऋषीची यज्ञीय गाय पळवून नेण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे परशुरामाने कार्तवीर्य आणि त्यांचे वंशज यांचा पराभव केला, असं या ठिकाणी म्हटलं आहे.

आईचा खून करणारा

आपली आई रेणुका हिचा वडिलांच्या आज्ञेने खून करणारा म्हणून आज्ञाधारक असा परशुरामाचा उल्लेख रामायणातसुद्धा (वा.रा.अयो.२१.३३) आहे. पुढे त्याच्या विनंतीनुसार, जमदग्नीने रेणुकेला पुन्हा जिवंत केलं, असं विष्णुधर्म पुराणात (१.३६.११) म्हटलं आहे. ‘पुराकथांचा अर्थ’ या ग्रंथात डॉ.स.अं.डांगे यांनी (पृ.२१७) वर याविषयीच्या दोन कथा दिल्या आहेत. जमदग्नी व रेणुका यांना रुमण्वान सुषेण,वसु आणि विश्‍वावसु ही चार मुलं व सर्वात लहान परशुराम होता. एकदा व्रतात असताना सर्व पुत्र फळं आणण्यासाठी वनात गेले. व्रतस्थ रेणुकाही आपल्या पतीची आज्ञा घेऊन (नदीवर) स्नान करण्यासाठी गेली. वाटेत (परत येताना) तिला चित्ररथ नावाच्या मार्तिकावत देशाच्या राजाचं आपल्या पत्न्यांसमवेत क्रीडा करतानाचं दृश्य दिसलं. त्याचं ऐश्‍वर्य आणि सुख बघून रेणुकेच्या मनात त्याच्याशी क्रीडा करण्याची वासना निर्माण झाली. हा व्यभिचार झाला ; त्यामुळे ती विमनस्क झाली आणि ती ओलावलेल्या वस्त्रानेच आश्रमात आली. ती ब्राह्म तेजापासून चळली आणि निस्तेज झालेली आहे, असं पाहून (व अंतर्ज्ञानाने सर्व जाणून) जमदग्नी क्रोधाविष्ट झाला. त्याने एकेका मुलाला (ते परत आले असताना) तिचा वध करण्याची आज्ञा दिली. चारही मुलांनी मातृस्नेहामुळे त्याची ती आज्ञा मानली नाही. त्याने मग परशुरामाला ती आज्ञा केली आणि इतर मुलांना पशूपक्ष्यांच्या योनीत जन्म होण्याचा शाप दिला. पित्याच्या आज्ञेप्रमाणे, परशुरामाने आपला परशू सरसावून मातेचा शिरच्छेद केला.

दुसऱ्या एका कथेनुसार एकदा जमदग्नी फळं व फुलं आणण्यासाठी वनात गेला. घरचं सर्व सफाईकाम आटोपून आणि परशुरामाला तिथेच ठेवून रेणुका नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. ती नदी नर्मदा होती. नदीवर पोचल्यावर पाणी घ्यायचं तिने ठरवलं तोच (तिच्या नेहमीच्या पाणी आणण्याच्या घाटावर (?) तिला दिसलं की, कार्तवीर्य अर्जुन (कृतवीर्याचा पुत्र अर्जुन) आपल्या स्त्रियांसह तिथे विहार करीत आहे. त्यांचा विहार संपेपर्यंत तिथेच थांबावं असे तिने ठरवलं. विहार संपवून कार्तवीर्य सहपरिवार तिथून निघून गेल्यावर ती पाणी आणण्यासाठी उतरली. पण तिथलं पाणी कार्तवीर्याच्या विहारामुळे गढूळ झालं होतं; म्हणून ती वर (पूर्वेच्या बाजूला) चालत गेली आणि तिथून पाणी आणण्याचं तिने ठरवलं. (नर्मदा ही पश्चिम वाहिनी आहे ; तेव्हा पूर्वेकडील भाग वरचा झाला) पण तिथे तिला दिसलं की शाल्व देशाचा राजा चित्ररथ हा आपल्या पत्नीबरोबर जलात विहार करीत आहे. त्या जोडप्याला पाहून तिच्या मनात विचार आला की, किती सुंदर हे जोडपं ! तिने इतकी सुंदर स्त्री किंवा इतका सुंदर पुरुष कधी पाहिला नव्हता ! त्यांच्या त्या जलक्रीडेकडे ती स्थिर दृष्टीने पाहात तिथे उभी राहिली. थोड्या वेळानंतर ती पाणी घेऊन आश्रमात आली. इकडे जमदग्नी केव्हाच आश्रमात परतला होता. थकून-भागून तो आला होता आणि आश्रमात पत्नीला न पाहून तो खवळला होता. रेणुकेने त्याला त्या स्थितीत पाहिलं आणि पाण्याचा घडा खाली ठेवून त्याला वाकून नमस्कार केला. आपल्याला यायला उशीर का झाला, हेही तिने सांगितलं. ते एकून जमदग्नी आणखी संतापला. त्याने आपल्या पुत्रांना एक एक करून बोलावलं आणि तिचा शिरच्छेद करण्यास सांगितलं ; कारण त्यांच्या मताने तिने फार मोठं पाप केलं होतं. पण त्या चारांपैकी कोणीही आपल्या आईला वधण्याची आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली नाही. मग त्याने परशुरामाला तशी आज्ञा केली आणि त्याने पित्याच्या आज्ञेप्रमाणे आपल्या आईचं मस्तक धडापासून वेगळं केलं.

मातंगी मरिअम्मा आणि यल्लम्मा

दक्षिण भारतातील कथेनुसार परशुरामाची आई मरिअम्मा होय. मरिअम्मा इतकी सच्चरित्र होती की, ती पाणी कुठल्याही भांड्यात न ठेवता, त्याचा एक गोळा करुन (बर्फासारखा!) हातावरच आणू शकत असे. स्नान केल्यानंतर तिचं नेसूचं वस्त्र वर हवेत अंधातरी राहातच सुकत असे. एकदा ती स्नान करून घरी परत येत होती. वस्त्र वरवर तिच्या डोक्यावर तरंगत होतं. तिने आणलेल्या पाण्याचा गोळा होऊन तो तिच्या तळहातात होता. याच सुमारास काही गंधर्वांची जोडपी (तिच्या डोक्यावरुन) आकाशात उडत होती. त्यांची छबी त्या जललोलकात पडली आणि त्यांना पाहून मरिअम्मा मोहीत झाली. पण त्या तिच्या इवल्याशा स्खलनाने तिचं सामर्थ्य नष्ट झालं. तो जलगोल विरून त्याचं पाणी जमिनीवर पडलं आणि तिचं वर वाळत असलेलं वस्त्र न सुकता ओलंच राहिलं आणि तसंच खाली आलं. त्याच अवस्थेत ती घरी आली. हा सर्व प्रकार पाहून जमदग्नीने विचारलं, तेव्हा तिने खरा प्रकार सांगितला. जमदग्नीने क्रोधाने लाल होऊन परशुरामाला आज्ञा केली, की तिला वनात नेऊन तिचं डोकं उडवावं. त्याची आज्ञा मान्य करून तो आपल्या आईला घेऊन वनात निघाला. परशुरामाबरोबर वनात जाताना मरिअम्माला एक अस्पृश्य स्त्री दिसली. तिने आपल्याला दया करावी या हेतूने मरिअम्माने तिला मिठी मारली आणि ती तिच्यापासून दूर होईना. त्या अस्पृश्य बाईनेही तिला घट्ट कवटाळलं. तेव्हा पित्याची आज्ञा भंग होऊ नये म्हणून परशुरामाने त्या अवस्थेत मरिअम्माच्या मानेवर आपल्या परशूने वार केला. त्याबरोबर दोघींचीही मुंडकी कापली गेली. तेव्हा अतिशय दु:खी होऊन परशुराम त्वरित आपल्या पित्याकडे आला आणि त्याने जे घडलं ते सर्व त्याला सांगितलं. आपली आज्ञा पाळणाऱ्या आपल्या पुत्राला जमदग्नीने वर मागण्यास सांगितलं. परशुरामाने आपली आई जिवंत व्हावी, असा वर मागितला. जमदग्नीने त्याला एका भांड्यात थोडं अभिमंत्रित पाणी आणि एक छडी दिली. त्याने त्याला सांगितलं की, शिर आणि धड व्यवस्थित जुळवून त्या जोडावर ते पाणी थोडं शिंपडायचं ; नंतर त्या शिराला छडीने थोडा स्पर्श करायचा ; म्हणजे तुझी आई जिवंत होईल. पाणी आणि छडी घेऊन परशुराम त्या स्थळी आला. पण घाईघाईने त्याच्या हातून त्या स्त्रियांची शरीरं आणि धडं यांची अदलाबदल झाली. अस्पृश्य स्त्रीचं शिर त्याने आपल्या आईच्या शरीराला जोडलं. नंतर त्याने त्या दोहोंवर पाणी शिंपडलं आणि त्या छडीचा स्पर्श केला. त्याबरोबर त्या दोघीही जिवंत झाल्या – पण संमिश्र शिर आणि धड घेऊन ! आता त्या दोघीही देवी झाल्या. मरिअम्माचं शिर व अस्पृश्य स्त्रीचं शरीर असलेली देवी मरिअम्मा झाली आणि दुसरी म्हणजे अस्पृश्येचं शिर असलेली यल्लम्मा झाली. मरिअम्मापुढे बकरे आणि कोंबडे यांचा बळी, तर येल्लम्मापुढे हेल्याचा (रेड्याचा) बळी देण्याचा प्रघात पडला.

रेणुका म्हणजेच मरिअम्माचं शिर अस्पृश्य मातंग स्त्रीचं असल्यामुळे दक्षिणेकडील परशुरामवंशीय ब्राह्मण स्त्रिया स्वत:चं शिर मातंगीचं आहे, असं समजून पाण्याचा घडा अपवित्र होईल म्हणून डोक्यावर न घेता कमरेवर ठेवतात. रेणुका उर्फ यल्लम्मा देवीचं शिर मांतगीचं आहे. अर्थात, ती मातंग गणाची मातृदेवता आहे. आज मातंग हे एक जातिनाम ठरलं आहे. पण जेव्हा ही जातिसंस्था अस्तित्वात यायची होती, तेव्हा मातंग हा एक प्रभावी गण होता. मातृसत्ताक अशा एका गणाची प्रमुख स्त्री मातंगी या नावाने प्रचलित झाली. तिला पूजणारे कालांतराने अस्पृश्य ठरले. महानुभाव साहित्यात मांगिणीपट या संप्रदायाचा उल्लेख आढळतो. त्यावर ‘लज्जागौरी’ या ग्रंथात डॉ.रा.चिं. ढेरे यांनी (पृ. ७२-८८) विस्ताराने माहिती दिली आहे. यल्लम्मा व रेणुका ही एकाच देवीची दोन नावं आहेत, असं त्यांनी सिद्ध केलं आहे. यावरून परशुरामाची आई मातंगी होती हे स्पष्ट होतं. कोळ्यांची देवता एकवीरा व रेणुका याही एकच आहेत. परशुरामासारखा वीर प्रसवला म्हणून तिला एकवीरा असं म्हणतात. पुणे जिल्ह्यातील लोणावळाजवळील कार्ले येथील महाचैत्याच्या पाशी एकवीरा देवीचं एक ठाणं आहे. पश्चिम समुद्राच्या काठचे सोनकोळी या देवीचे उपासक आहेत.

बिनबापाचा परशुराम

डॉ. ढेरे यांनी लज्जागौरी (पृ.६६) या ग्रंथात ‘कुमारी रेणुका आणि बिनबापाचा परशुराम’ या शीर्षकाखाली एक टिपण केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘वारूळरूपात पूजिली जाणारी रेणुका ही भूमी आहे. कुमारी भूमी आहे, हे आपण पाहिलं आहे. मातृदेवता सकल सर्जनाचा गर्भ प्रत्येक ऋतूत उदरी वाढत असूनही ती अखंड कुमारीच असते. पुरुषतत्वाला ती अनेक नात्यांत सांभाळते, परंतु तरीही तिचं कौमार्य भंगत नाही, हा विचार मातृदेवतेच्या उपासनापरंपरेत सातत्याने नांदताना आढळतो. सौंदत्ती येथील यल्लमेच्या-रेणुकेच्या पारंपरिक गीतात तिच्या कौमार्याचा-कोरेपणाचा उल्लेख वारंवार येतो. परशुरामाचे सखे-सवंगडी त्याला ‘बिनबापाचा पोर’ म्हणून एकसारखे हिणवतात, तेव्हा परशुराम आईकडे जाऊन माझा बाप दाखीव लवकरी असा आग्रह धरतो. त्यावर रेणुका म्हणते –

संभाच्या लेकी खेळाय गेल्या होत्या | सहा जणींनी गण (?) देताना |
तुला बिनबापाचा मागून घेतला | मला नाही पति, तुला नाही बाप |
कुठला दाऊ अशा येळंला |

अशी माहिती देऊन मातंगीपट्ट संप्रदायातील मुक्त लैंगिक संबंधाच्या परंपरेचा संदर्भ दिला आहे. रेणुकेचं स्थान असलेल्या माहूर येथे मातंगी देवीचंही मंदिर आहे व तीच मूळ रेणुका होय.

बहिष्कृत परशुराम

परशुरामासारख्या एकमेव वीराला जन्म देणारी म्हणून पूजनीय ठरलेली रेणुका एकवीरा म्हणून गौरवली गेली असली तरी, त्या तथाकथित एकमेव अशा वीराला मात्र परंपरेने बहिष्कृत ठरवलं आहे. चिपळूण वगळता इतरत्र परशुरामाचं मंदिर कुठे आढळत नाही. त्याचप्रमाणे दशावतारामध्ये गणना होऊनही त्यावर एकही पुराण रचलं गेलं नाही. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह व वामन यांच्या नावांवर एकेक पुराण आहे. पण परशुरामावर पुराण रचण्याची प्रेरणा कुणा पुराणिक वा प्रतिभावंताला झाली नाही. अवतारकल्पनेत धर्माचं रक्षण करण्याकरिता विष्णू अवतार घेतो, असं म्हटलं असलं तरी राम या एका पूर्णावताराशी परशुराम लढाई करतो व त्यात तो पराभूत होतो. धर्माला वाचवण्याऐवजी आपसात लढणारे दोन अवतार पाहिले की अवतारकल्पनेतला फोलपणा दिसून येतो. सीता स्वयंवराच्या वेळी रामाने शिवाचं धनुष्य तोडलं होतं. आपल्या गुरुचं-शिवाचं-धनुष्य तोडल्याचा अपमान सहन न होऊन परशुराम रामाशी युद्धाला तयार होतो. यात परशुरामाला पराभूत करून त्याचं तपसामर्थ्य नष्ट करण्याचा शाप राम देतो, अशी कथा वाल्मिकी रामायणात (बालकांड ७४.७६) आहे. कार्तवीर्य अर्जुनाचा वध केल्यानंतर परशुराम शिवाच्या दर्शनार्थ जातो. तेथे शिवपुत्र गणेश त्याला अडवतो. त्यामुळे गणेशाशी त्याचं युद्ध होतं. या युद्धात गणेशाचा एक दात तुटतो, अशी कथा ब्रह्मांडपुराणात आहे. (३.४२) राम व गणेश हे तत्कालीन मूळनिवासी लोकांचे महानायक असल्यामुळे कदाचित परशुराम हा जनमानसाच्या तिरस्काराचा विषय झाला असावा व त्यातून तो बहिष्कृत ठरला असावा.

चिरंजीवित्वाची फोल धारणा

रामायण व महाभारत या दोन्ही महाकाव्यात परशुरामाच्या कथा आहेत. या दोन्ही महाकाव्यांच्या निर्मितीकाळामध्ये फारसा फरक नसला तरी, त्यातील कथांमध्ये तो खूप मोठा आहे. त्यामुळे काळविपर्यासाचा दोष त्यांच्यावर येतो. याविषयी म.म.चित्रावशास्त्री म्हणतात, ‘इस कालविपर्यास का स्पष्टीकरण महाभारत एवं पुराणों मे, परशुराम को चिरंजीव कह कर दिया गया है | संभव है कि, प्राचीन काल के परशुराम की महत्ता एवं ब्रह्मतेज का रिश्ता महाभारत एवं रामायण के पात्रोंसे जोडने के लिए यह चिरंजीवित्व की कल्पना प्रसृत की गयी हो ! (भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, पृ. ३९४)’ यावरून परशुरामाच्या चिरंजीवित्वाच्या कल्पनेमागील हेतू स्पष्ट होतो.

चिरंजीवित्वाच्या या धारणेला छेद देणारा एक श्लोक महाभारतात आहे. तो असा –

एवं शतगुणैर्युक्तो भृगूणां कीर्तिवर्धन: |
जामदग्न्यो ह्यतियशा मरिष्यति महाद्युति : | (द्रोणपर्व ७०.२३-२४)

अर्थ : अशा प्रकारे शंभर गुणांनी युक्त, भृगूंची कीर्ती वाढवणारा महातेजस्वी व अत्यंत यशस्वी असा परशुराम मरणार आहे.

महात्मा फुले यांचे परशुरामास पत्र

परशुराम चिरंजीव आहे या धारणेला आव्हान देणारं एक पत्र महात्मा फुले यांनी परशुरामास लिहिलं होतं, ते असं –

चिरंजीव परशुराम ऊर्फ आदिनारायणाचा अवतार यास –

मुक्काम सर्वत्र ठायी,
अरे दादा परशुरामा, तू ब्राह्मणांच्या मढ्यापासून चिरंजीव आहेस, तू कडू का होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यांपासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यांपासून उत्पन्न केलेले ब्राह्मण यांपैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून बसले आहेत, त्यांना काही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही. फक्त तू येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. तू या नोटिशीच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत येऊन हजर झाल्यास, मी तर काय, पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महार-मांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणवणाऱ्या ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजिती करण्यास कधी कमी करणार नाहीत आणि तेणेकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यास विश्‍वमित्रासारखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.
आपला खरेपणा पाहाणारा
जोतीराव गोविंदराव फुले
तारीख १ ली, माहे आगस्ट, सन १८७२ इसवी, पुणे जुना गंज, घर नं. ५२७
(संदर्भ : महात्मा फुले : समग्र वाङ्मय, पृ. १६२)

परशुरामाने आपल्या आईचा तसेच क्षत्रियांच्या पोटातील गर्भाचा ज्या निर्दयतेने खून केला, त्याबद्दलही महात्मा फुले त्याचा निषेध अखंडात करतात,

परशुराम देव साचा | वधकरी अर्भकांचा ||
आर्या अवतार परशुरामाचा | वैरी विधवांचा || बाळे वधी ||9||
पोटी पुत्र होता परशुरामाने || वधीली शस्त्राने तान्ही बाळे ||10||
वध केला साच रेणुकामातेचा || लाडका पित्याचा || दैव कैचा ||11||
(म. फु. : समग्र वाङ्मय पृ. ५३४,७२,७९)

चित्पावन ब्राह्मण

परशुरामाला लिहिलेल्या पत्रात ब्राह्मणांच्या मढ्याचा उल्लेख आहे. ते मढ कोणत्या ब्राह्मणांचं व कुणी परशुरामाला चिरंजीव केले, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचं उत्तर पं. महादेवशास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृतीकोशात (खंड तिसरा, पृ. ४०२ दिलं आहे, ते म्हणतात –

‘क्षत्रियांचा संहार केल्यामुळे परशुराम पतित झाला होता. म्हणून ब्राह्मणांनी त्याचं पौरोहित्य करण्याचं नाकारलं. त्याच सुमारास सह्यपर्वताच्या पायथ्याशी पश्चिम किनाऱ्यावर वाहून आलेली १४ परदेशी माणसांची शवं परशुरामाला दिसली. त्याने त्या प्रेतांना चितेच्या अग्नीत शुद्ध करून मग सजीव केलं आणि त्या माणसांना ब्राह्मणांची विद्या शिकवली. रक्तपाताच्या पापातून मुक्त होण्यासाठी जे विधी करावे लागतात, ते करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी परशुरामाला सहाय्य केलं. पुढे त्यांना वसाहत करण्यासाठी परशुरामाने पश्चिम सागराकडून काही भूमी मिळवून दिली व त्यांच्या त्या वसाहतीला चित्पावन हे नाव दिलं. …’ परशुरामाने प्रेतांपासून १४ ब्राह्मण उत्पन्न केले तेच चित्पावन, या स्कंद पुराणातील कथेवरून असं अनुमान करता येतं की, १४ माणसं मरणोन्मुख स्थितीत भारताच्या किनाऱ्याला लागली असावी व ती गलबतातून बराच लांबचा प्रवास करून तिथे आली असावी. कदाचित इराणच्या आखातातून ती माणसं आली असतील. परशुरामाने त्यांना अन्नपाणी देऊन वाचवलं असेल आणि इथे वसाहत करण्यास मदत केली असेल, असा त्या कथेचा अर्थ लावता येतो.

नि:क्षत्रिय पृथ्वी (?)

परशुरामाच्या चिरंजीवित्वाची धारणा पसरवण्यामागे हेतू काय असू शकतो ? आजही तो क्षत्रियांना नष्ट करण्याकरिता येऊ शकतो हा वचक बसावा. त्याने एकवीस वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केली होती, असं पुराणांनी म्हटलं आहे. पण पृथ्वीची त्यांची कल्पना फारच मर्यादित होती. पं. महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशात (खंड पाच, पृ. ४२८) म्हणतात, ‘ क्षत्रियसंहारासाठी परशुरामाने ज्या देशात संचार केला, त्यांच्या नामावळीत दक्षिणापथातल्या देशांची नावं आढळत नाहीत. त्यांचा मुख्य पराक्रम नर्मदा प्रदेशात झाला व त्यापुढील पराक्रम उत्तर व पूर्व या दिशांना झाले. यावरून असं दिसून येतं की, दक्षिण देशात त्यावेळी आर्य संस्कृतीचा प्रसार झाला नव्हता. नर्मदेच्या खाली क्षत्रिय राज्यसंस्थाही अस्तित्वात नव्हती. अर्थात, ज्या काळी दक्षिणेत क्षत्रिय राज्यसंस्था नव्हती, अशा कोणत्या तरी काळी परशुराम झाला असला पाहिजे. डॉ.पुसाळकर हा काल साडेचार वर्षामागचा मानतात. तर प्रा.माटे यांच्या मते, तो सात हजार वर्षामागचा आहे.’ म्हणजे, संपूर्ण भारतभरही ज्याचा संचार नव्हता, त्या परशुरामाने नि:क्षत्रिय पृथ्वी केली आणि तीही एकवीस वेळा हे तर धादांत खोटं आहे. मुळात एकदा नि:क्षत्रिय केल्यावर पुन्हा ती करण्याची गरजच का भासावी ? अतिशयोक्तीची ही पराकोटीच म्हटली पाहिजे. पण क्षत्रियाचं त्याला वावडं का असावं?

याविषयी पं. महादेवशास्त्री जोशी म्हणतात की, ‘ क्षत्रियांनी केलेला ब्राह्मणांच्या गायींचा अपहार हे परशुरामाच्या संहारककार्याचं कारण म्हणून पुराणे सांगतात. पण एवढ्या मोठ्या उत्पात परंपरेला ते कारण अपुरं वाटतं. कार्तवीर्याने केवळ गाय चोरावी आणि त्यातून या दोन वर्णांचं प्राणांतिक युद्ध उद्भवावं, हे असंभाव्य वाटतं. खरं तर, कार्तवीर्यासारख्या एका सम्राटाला एखाद्याची गाय चोरण्याची काय गरज होती ? जमदग्नीच्या गायीप्रमाणेच वसिष्ठाची गायही त्याने चोरली होती आणि त्याबद्दल वसिष्ठाचा शाप घेतला होता, पण केवळ गाय चोरल्यामुळे शांति ब्रह्म वसिष्ठ इतका खवळून शाप देण्याला प्रवृत्त झाला असेल, ही शक्यता कमी वाटते. यावरून असं अनुमान करावं लागतं की, अपहृत केलेल्या त्या गायी नसून आश्रमीय स्त्रिया असल्या पाहिजेत.’ यावरून कार्तवीर्य अर्जुन व परशुरामाच्या संघर्षाची वेगवेगळी कारणं पुराणांनी सांगितली आहेत. तीही खरी आहेत कशावरून?

परशुरामाचा मृत्युदाता सुभौम

परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची घोषणा ही राणा भीमदेवी थाटाची आहे व तिची तथाकथित कृती ही अतिरंजित आहे. ज्या कारणासाठी हे मिथक लोकप्रिय करण्यात आलं तेही स्पष्ट आहे. क्षत्रियांवर ब्राह्मणांचा वरचष्मा राहावा यासाठी ते रचण्यात आलं, पण त्यासाठी जे कारण सांगण्यात येतं तेही फसवं आहे. पश्चिम भारतातील हैहयवंशातील सम्राट कार्तवीर्य अर्जुन व भृगुवंशीय ब्राह्मण परशुराम यांच्यातील संघर्ष केवळ दोन व्यक्तींमधील नव्हता, तर तो अनेक पिढ्यांचा होता. तो कार्तवीर्याचा पिता कृतवीर्य याच्या काळात सुरू झाला व त्याचा पुत्र सुभौम याने परशुरामाचा वध करून संपवला. जैन परंपरेत होऊन गेलेला चक्रवर्ती सुभौम याने आपला पिता कार्तवीर्य अर्जुन याच्या हत्येचा बदला घेण्याकरिता परशुरामाला ठार मारलं, अशी कथा अनेक जैन ग्रंथांमध्ये आली आहे. जैन महापुराण (६५-५१-५५, १३१-१५०, १६६-१६९), पद्मपुराण (५-२२३, २०.१७१-१७७), हरिवंशपुराण (२५.८-३३, ६०.२८७, २९५), जैन पुराणकोश (पृ. ४५४, ४५५) इ. ठिकाणी जैन साहित्याने ती जाणीवपूर्वक नोंदवून ठेवली आहे.

अवसर्पिणी या जैन कालगणनेच्या दु:षमा-सुषमेच्या चौथ्या काळातील शलाकापुरुष तसंच आठवे चक्रवर्ती सुभौम यांचा जन्म तीर्थंकर अरनाथ व मल्लिनाथ यांच्या दरम्यान झाला होता. हस्तिनापूर येथील राजा कार्तवीर्य व त्यांची राणी तारा यांच्या पोटी ते जन्मले. त्यांच्या वडिलांनी कामधेनूसाठी जमदग्नीला ठार केलं. त्याचा बदला परशुरामाने कार्तवीर्यला मारून घेतला. तारा भयभीत होऊन आपला प्राण वाचवण्यासाठी कौशिक ऋषींच्या आश्रमात गेली. आश्रमाच्या तळघरात तिने ज्या बाळाला जन्म दिला, त्याला भूमीच्या पोटात जन्मला म्हणून सुभूम किंवा सुभौम हे नाव दिलं गेलं. त्याने आपल्या पित्याच्या मृत्यूचं रहस्य आईकडून जाणलं. परशुरामाच्या दानशाळेत जाऊन त्याने भोजन केलं. परशुरामाने त्याच्या ताटात दान टाकले. त्याचं रुपांतर खिरीत झालं. यावरून परशुरामाने त्याला आपला शत्रू म्हणून ओळखलं. आपल्या परशूने त्याने सुभौमवर वार केला. तेव्हा त्याच्या जेवणाच्या ताटाचं रूपांतर चक्रात झालं. त्याने त्या चक्राने परशुरामाला ठार केलं. त्याने त्याच चक्राने एकवीस वेळा पृथ्वीला ब्राह्मणरहित केलं. परशुरामाच्या नि:क्षत्रिय पृथ्वी करण्याचं हे उत्तर जैन ग्रंथांनी जपलं आहे. (जैन इतिहासाचे अभ्यासक प्रा. प्रदीप फलटणे यांनी ही माहिती तळेगाव दाभाडे येथील समाधान सुशीर पाटील यांच्याद्वारे मला दिली.) सुभौमशिवाय परशुरामाचा सामना दाशरथी रामाशीही झाला असल्याचा उल्लेख रामायणात आहे. (वा.रा.वा. ७४-७६) त्यात रामाने परशुरामाला पराभूत केलं. एका क्षत्रिय राजाकडून परशुराम पराभूत झाला. महाभारतात सौभपती शाल्वाकडून परशुराम पराभूत झाला. (महा.स.परि.१ क्र.२१) शिवपुत्र गणेशाशीही युद्ध करून त्याचा दात परशुरामाने तोडला होता. अशी कथा ब्रह्मांडपुराणात आहे. (ब्रह्मांड ३.४२)

पुराणातल्या परशुरामाचे असे कितीतरी शत्रू बहुजनसमाजाचे महानायक आहेत. अशा परिस्थितीत ब्राह्मण महासभेला क्षत्रियाच्या विरोधात परशुरामाला उभं करणं कसं शक्य आहे? आजच्या आधुनिक युगातही पौराणिक मिथ्यांचा वापर जातियुद्धासाठी करणं कितपत शक्य व योग्य आहे? मिथकं किती काळ आपल्या समाजाचं नेतृत्त्व करणार आहेत? जिवंत महानायक अपुरे पडले की काय? याचाही विचार परशुराम नाचवणाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर खोटं जास्त काळ टिकत नाही, याचंही भान ठेवावं.

“दैवतांची सत्यकथा”या आगामी पुस्तकामधून.

The post परशुराम विरुद्ध सुभौम – डॉ.अशोक राणा first appeared on Satyashodhak.

Viewing all articles
Browse latest Browse all 15

Latest Images

Trending Articles





Latest Images